मुंबई - विश्वचषकापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात कांगारू ५ एकदिवसीय सामने आणि २ टी-२० सामने खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱ्यातील पहिला टी20 सामना बंगळूरु येथे २४ फेब्रुवारीला खेळण्यात येईल. तर अखेरचा सामना १३ मार्चला खेळविला जाईल.
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण विश्वचषकापुर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक २०१९ च्या तयारीसाठी भारतीय संघाच्या दृष्टीने या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यानंतर इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) २३ मार्चपासून सुरवात होणार असून ३१ एप्रिलला ही स्पर्धा संपणार आहे. तर विश्वचषक २०१९ ही स्पर्धा ३० मे ते १४ जुलै यादरम्यान खेळण्यात येईल.