लंडन -अॅशेस मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा २५१ धावांनी पराभव केला. यंदाचे विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा इंग्लंडचा संघ कसोटीमध्येही प्रबळ मानला जात होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चांगलाच धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १४६ धावांवर आटोपला. दुसऱया डावात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियानने ६ गडी बाद केले. तर त्याला पॅट कमिन्सने ४ गडी बाद करत साथ दिली.
अॅशेस कसोटी : ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का.. २५१ धावांनी केला पराभव - ashes
ऑस्ट्रेलियाच्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १४६ धावांवर आटोपला.
कालच्या डावावरुन पुढे प्रारंभ करताना अवघ्या सहा धावांत इंग्लंडला पहिला धक्का लागला. पहिल्या डावात शतक झळकावणारा रोरी बर्न्स ११ धावा करुन बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार जो रुटने जेसन रॉयला सोबत घेत ४१ धावांची भागीदारी रचली. नॅथन लियानने रॉयला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर इंग्लंडच्या ८० धावा असताना त्यांना जो डेन्ली बाद झाला. त्यानंतर इंग्लंडची पडझड सुरु झाली.
या डावामध्ये ख्रिस वोक्सने इंग्लंडकडून सर्वाधिक ३७ धावा केल्या. दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली आहे.
धावफलक -
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) - २८४/१०
- इंग्लंड (पहिला डाव) - ३७४/१०
- ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) - ४८७/७ घोषित
- इंग्लंड (दुसरा डाव) - १४६/१०