लंडन -जोफ्रा आर्चरच्या सहा बळींच्या जोरावर इंग्लंडने अॅशेसच्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर कुरघोडी केली आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कांगारुंनी पहिल्या डावात सर्वबाद २२५ धावा केल्या आहेत. मालिकेत भन्नाट फॉर्मात असणाऱ्या स्टीव स्मिथने ८० धावांची झुंजार खेळी करत संघाला सव्वादोनशेचा टप्पा गाठून दिला.
हेही वाचा -राहुलने लक्ष्मणचा आदर्श घ्यावा, एम.एस.के. प्रसाद यांचा सल्ला
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर परत अपयशी ठरला. आर्चरने दुसऱ्याच षटकात त्याला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर स्मिथने मार्नस लाबूशेनला बरोबर घेत ६९ धावांची भागीदारी केली. लाबूशेन बाद झाल्यानंतर, मॅथ्यू वेडही त्याच्या पाठोपाठ परतला. स्मिथने संघाला सावरत आपले अर्धशतक गाठले. ८० धावांवर असताना स्मिथला ख्रिस वोक्सने पायचीत केले. त्यानंतर आलेल्या पीटर सीडल १८ धावा आणि नॅथन लायन २५ धावा यांनी छोटी भागीदारी रचली. आर्चरनेच यांना माघारी पाठवले.
आर्चरने ६२ धावांत सहा बळी घेतले. इंग्लंडने दुसऱया डावाला सुरुवात केली असून रॉरी बर्न्स ४ धावांवर आणि जो डेन्ली खेळत १ धावावर खेळत आहे.