मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत असलेल्या भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला दुखापत झाली असून यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.
बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, एमसीजी मैदानावर भारतीय संघाने शनिवारी सराव केला. या सराव सत्रात नेटमध्ये फलंदाजीदरम्यान, केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी तीन आठवड्याचा वेळ लागू शकतो.
दुखापत झाल्याने, राहुल भारतात परतणार आहे. तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत उपचार घेईल, असे देखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केएल राहुलला पहिल्या दोन कसोटी सामन्यात अंतिम संघात स्थान मिळालेले नव्हते.