मुंबई - भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ४-० ने गमावणार असा अंदाज रिकी पाँटिंगसह अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी व्यक्त केला होता. पण झाले उलटेच, भारतीय संघाने प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असताना, तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात २-१ ने पाणी पाजलं. ऑस्ट्रेलियाच्या या पराभवावर अद्याप विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने दिली आहे.
रिकी पाँटिंग म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख खेळाडू संपूर्ण मालिका खेळले. तरीदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागला. यावर अद्याप मला विश्वासच बसत नाही. एकाप्रकारे भारताच्या 'अ' संघानेच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात भारतीय संघाने ही मालिका जिंकून दाखवली.'
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला. तेव्हा भारतीय संघ १-० ने पिछाडीवर होता. अशात प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे भारताला नवख्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संपूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. फक्त पहिल्या दोन सामन्यात डेव्हिड वॉर्नर नव्हता. तरीही पराभवाला सामोरे जावे लागले, हा माझ्यासाठी धक्काच आहे, असे देखील पाँटिंग म्हणाला.