मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकाडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर आयपीएलचे काय होणार अशी चर्चा रंगली. यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी, यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यात देशातील लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार होता. यामुळे आयपीएल होईल, अशी चाहत्यांशी आशा होती. पण लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी मोदींनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगत त्याचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला.
केंद्राच्या या निर्णयानंतर बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार आहे. जर परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.