मुंबई- आज संपूर्ण जगामध्ये फादर्स डे साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने, भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अजिंक्यने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन, लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो त्याच्या आई-बाबांसह पाहायला मिळत आहे. त्याने हा फोटो शेअर करत, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले, असे म्हटले आहे.
अजिंक्यने याआधी एका मुलाखतीमध्ये आई-बाबांविषयी सांगितले होते. तो आईविषयी म्हणाला की, 'मी लहान असताना सरावासाठी आईसोबत जात असे. माझ्यामुळे आईला जवळपास ८ किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागत होते. ती एका हातात लहान भावाचे हात तर दुसऱ्या हातात माझ्या क्रिकेटचे कीट घेऊन हे अंतर कापत असे. मला आर्थिक अडचणीमुळे आठवड्यातून एकदाच फक्त रिक्षाने सरावाला जाता येत होते.'
यानंतर त्याने वडिलांचा एक किस्साही बोलून दाखवला. डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून, मी योग्य रितीने जातोय की नाही, हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे, असे त्याने सांगितले.