अहमदाबाद - भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय होता. कारण मागील अनेक सामन्यात विराटला मोठी खेळी करता आलेली नव्हती. पण विराटने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचा हा फॉर्म एका व्यक्तीमुळे परत आल्याची कबुली खुद्द विराटने दिली आहे.
विराट कोहलीला २०२० या सालामध्ये एकही शतक करता आले नाही. भारताकडून पदार्पण केल्यानंतर असे पहिलेच वर्ष ठरले ज्यात त्याला शतक करता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी विराटने अखेरच्या ४ सामन्यात ०, २७, ०, ० अशा धावा केल्या होत्या. धावांचा हा दुष्काळ विराटने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७३ धावा करत संपवला. विराटने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह ही खेळी साकारली. विराटने या सामन्याआधी त्याचा खास मित्र दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सशी चर्चा केल्याचे सांगितले.
सामना झाल्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत विराटने सांगितले की, 'मी फोकस बेसिक्सवर केला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सहकारी एबीशी चर्चा केली. एबी सोबतच्या चर्चेचा मला फायदा झाला. या चर्चेमुळेच मी चांगली फलंदाजी करू शकलो. एबीने मला चेंडूकडे पाहण्यास सांगितले आणि मी तसेच केलं'