मुंबई - प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटपटू अभिषेक नायरने निवृत्ती जाहीर केली. कॅप्टन कुल धोनीच्या नेतृत्वाखाली अभिषेकला २००९ मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, चांगली कामगिरी करू न शकल्याने त्याला संघाबाहेर बसवण्यात आले. निवृत्तीनंतर, अभिषेकने युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
हेही वाचा -'दादा' बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान
३६ वर्षीय अभिषेक रणजी ट्रॉफीमधून नावारूपास आला होता. त्याने स्थानिक क्रिकेटमधून खेळताना मुंबई आणि पुद्दुचेरी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. डावखुरा फलंदाज आणि कामचलाऊ गोलंदाज अशी ओळख असलेल्या नायरला २०१७-१८ मध्ये मुंबई संघातून वगळण्यात आले. त्यानंतर नायरने पुद्दुचेरी संघाकडून मागच्या हंगामात तीन सामने खेळले होते.
'मी याबद्दल थोडा वेळ विचार करत होतो. जेव्हा आपल्याकडे उच्च पातळीवर खेळण्याची संधी नसते तेव्हा एका युवा क्रिकेटपटूसाठी मार्ग तयार करणे चांगले असते. मागे राहण्यात काही अर्थ नाही', असे नायरने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
२०१२-१३ च्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये नायर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने मुंबईकडून ९६६ धावा चोपल्या होत्या. या कामगिरीसाठी लाला अमरनाथ पुरस्कारही मिळाला होता. नायरने १०३ प्रथम श्रेणी सामन्यात ५ हजार ७४९ धावा आणि १७३ गडी बाद केले आहेत. तर ९९ लिस्ट ए सामन्यात त्याने २ हजार १४५ धावा केल्या आहेत. याशिवाय ७९ विकेटही घेतल्या आहेत.