मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन शहरात खेळवला जाणार आहे. पण ब्रिस्बेन शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे ब्रिस्बेनमध्ये तीन दिवसांसाठी कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात उभय संघातील कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
बीसीसीआयने गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले आहे. परंतु या घटनेच्या २४ तासांच्या आतच ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला. शहरातील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यास नव्या प्रकारचा कोरोना झाल्याने खबरदारी म्हणून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय ब्रिस्बेनचा समावेश असलेल्या क्वीन्सलँड राज्यातही या पार्श्वभूमीवर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.