मुंबई : आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे ( Transportation of IPL players ) काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने, मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी खेळाडूंसाठी असलेल्या बसेस मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर फोडल्या. या प्रकरणी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या ( Municipal elections ) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच स्थानिकांच्या मुद्यांवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी मनसे पूर्ण तयारी करत आहे.
दिल्ली कॅपिटल संघाच्या बसवर हल्ला -
दिल्ली कॅपिटल या आयपीएल ( Delhi Capital team bus ) संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 143,147,149,427 अंतर्गत 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आता कुलाबा पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.