नवी दिल्ली : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी, 1 जुलै रोजी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा नवा लीड प्रायोजक म्हणून ऑनलाईन फॅन्टसी गेमिंग कंपनी 'ड्रीम 11'ची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ड्रीम 11 सोबत आगामी तीन वर्षांसाठी करार केला आहे.
ड्रीम 11 बायज्यूसची जागा घेणार : बीसीसीआयच्या या घोषणेनंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम 11 चे नाव आणि लोगो दिसणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 2025 या कालावधीतील भारतीय संघाची पहिली मालिका असेल. ड्रीम 11 स्पॉन्सर म्हणून बायज्यूसची जागा घेणार आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षांनी केले अभिनंदन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ड्रीम 11 चे भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रायोजक बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रॉजर बिन्नी म्हणाले की, 'बोर्ड ड्रीम 11 चे स्वागत करतो आहे. बीसीसीआयचे अधिकृत प्रायोजक होण्यापासून ते आता मुख्य प्रायोजक होण्यापर्यंतचा प्रवास खूप छान आहे. आता बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत होत आहे. ही भारतीय क्रिकेटचा विश्वास, मूल्य, क्षमता आणि वाढ याची साक्ष आहे'.
बीसीसीआयने अलिकडेच किट प्रायोजकही बदलले : रॉजर बिन्नी म्हणाले की, 'आम्ही या वर्षाच्या अखेरीस आयसीसी विश्वचषक 2023 चे आयोजन करण्याची तयारी करत आहोत. स्पर्धेत प्रेक्षकांना चांगला अनुभव मिळावा ही आमची पहिली प्राथमिकता आहे'. अलीकडेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपूर्वी, बीसीसीआयने भारताचे किट प्रायोजक बदलले होते. 'आदिदास' ला टीम इंडियाचे नवीन किट प्रायोजक बनवण्यात आले आहे. आदिदासने 'किलर'ची जागा घेऊन हा करार केला.
हे ही वाचा :
- Ambati Rayudu : अंबाती रायुडू नवी राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत, लवकरच होणार खुलासा
- Team India : वर्ल्ड कपसाठी अजित आगरकरांकडे BCCI देणार मोठी जबाबदारी?
- ICC World Cup 2023 : 'हे' चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, विश्वचषकावर वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी