नवी दिल्ली :क्रीडा रसिकांना आस लागून असलेल्या आशिया कपचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांना पुन्हा क्रिकेटचा आनंद उधळता येणार आहे. बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्षही आहेत. त्यांनीच आशिया चषक 2023 चे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे भिडणार आहे.
30 ऑगस्टपासून सुरू होणार क्रिकेटचा उत्सव :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आशिया चषकाची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील मुल्तानमधील सामन्यातून होईल. तर आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी ट्विट करुन आशियाई स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.
जय शाह यांनी केले वेळापत्रक ट्विट :आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकाचे वेळापत्रक ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी 'मला बहुप्रतिक्षित पुरुष एकदिवसीय आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे. आशिया चषक विविध देशांना एकत्र बांधणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे! चला क्रिकेटच्या उत्सवात सामील होऊया आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या बंधांची काळजी घेऊ या, असे ट्विट जय शाह यांनी केले आहे.
भारतासोबत पाकिस्तान अ गटात :आशिया चषकात भारत अ गटात आहे. अ गटातच पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा देखील समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. भारत 2 सप्टेंबरला कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याच मैदानावर त्यांचा दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे. सुपर फोर टप्प्यातील सामने 6 सप्टेंबरला लाहोर येथे संबंधित गटातील A1 आणि B2 संघांमधील संघर्षाने सुरू होतील. उर्वरित सामने कोलंबो, श्रीलंकेत होणार असून 17 सप्टेंबरला कोलंबो येथे अंतिम सामना होणार आहे.
भारत आशिया चषकात सर्वात यशस्वी संघ :5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतात आयोजित होणार्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला लक्षात घेऊन ही स्पर्धा 50 षटकांच्या स्वरूपात आयोजित केली जाणार आहे. श्रीलंका मागील वर्षाचा आशिया चषक चॅम्पियन आहे. श्रीलंका संघाने आतापर्यंत एकूण सहा वेळा आशिया चषक पटकावला आहे. तर भारतीय संघ एकूण 7 विजेतेपदांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.