ओडेन्से (डेन्मार्क) -भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल सध्या सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाली आहे. महिला एकेरीच्या या सामन्यात सायनाला जपानच्या सायाका ताकाहाशीने १५-२१, २१-२३ असे पराभूत केले.
हेही वाचा -खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्याला मितालीने दिले सडेतोड उत्तर
दुसरीकडे, पुरुषांच्या एकेरीमध्ये समीर वर्माने पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. समीरने जपानच्या केंटा सुनेयामाला २१-११, २१-११ असे पराभूत केले. समीरने २९ मिनिटांमध्येच हा विजय मिळवला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की यांच्या जोडीने जर्मनीच्या मार्विन सेईडेल आणि लिंडा इफेअर यांना २१-१६, २१-११ असे हरवले.
पुरूष दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी विजयी प्रारंभ केला आहे. त्यांनी कोरियाच्या किम जी जुंग व ली योग डेई या जोडीचा २४-२२, २१-११ ने पराभव केला. तर, जगज्जेती पी. व्ही. सिंधूने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुंजुंगचा पराभव केला. हा सामना रोमांचक ठरला. मात्र, यात सिंधूने २२-२०, २१-१८ ने बाजी मारत या खेळाडूविरुद्धचा शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड कायम राखला.