जकार्ता- भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाला. जपानची खेळाडू अकाने यामागुची हिने सिंधूचा 21-15, 21-16 असा पराभव केला. या पराभवाने रिओ ऑलम्पिंक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. यामुळे हा सामना 51 मिनिटे रंगला. मात्र यात सिंधूचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पहिल्या गेममध्ये स्कोर 8-8 असे बरोबरीत होता. त्यानंतर सिंधूने 11-8 अशी बढत घेतली. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत 4 थ्या क्रमांकावर असलेल्या अकाने हिने सिंधूला कोणतेही संधी दिली नाही आणि हा गेम 21-15 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सामन्यात वापसी करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याला आपला पराभव वाचवता आला नाही. ती दुसरा गेम 21-16 ने हरली.
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत 3 नंबरवर असलेल्या चीनच्या चेन यू फेईचा पराभव केला होता. यामुळे सिंधूचे अंतिम फेरी जिंकण्याच्या आशा वाढल्या होत्या. मात्र अकाने हिने सिंधूचा पराभव करत स्पर्धा जिंकली.