बासेल - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. सिंधूबरोबरच मानसी जोशीनेही पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. मानसीने अंतिम सामन्यात ३ वेळा विश्वविजेती पारुल पारमारचा पराभव केला.
जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील महिला गटाच्या अंतिम सामन्यात मानसीने हमवतनच्या पारुल पारमारचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मानसीने पारुलचा २१-१२, २१-७ असा पराभव केला.
मानसी जोशीला २०११ मध्ये एका रस्ता अपघातात आपला पाय गमावावा लागला. अपघातामध्ये तिला अनेक जखमा झाल्या. पण ति खचली नाही. तिच्यावर तब्बल ५० दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघाताच्या एका वर्षात तिने कृत्रीम पायावर चालण्यास सुरुवात केली. आणि त्याचवेळी तिचा पॅरा बॅडमिंटनच्या खेळाची सुरुवात झाली. दुर्घटनेनंतर आठ वर्षांनी मानसीने सुवर्ण कामगिरी केली.