हैदराबाद - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या श्वेता जयंतीसोबत साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर, दुसऱ्या दिवशी साई प्रणीतने आगामी सैय्यद मोदी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सरावाला सुरूवातही केली.
हेही वाचा -विराट म्हणतो, 'या' खेळाडूला पकडणं 'मुमकिन ही नही नामुमकिन'
या समारंभासाठी भारताची फुलराणी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप, अश्विनी पोनप्पा, चिराग शेट्टी, प्रणव जेरी चोप्रा, एचएस प्रणॉय, गुरुसाई दत्त आणि इतर खेळाडूदेखील उपस्थित होते.
'सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे, म्हणून सध्या माझ्याकडे इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे कोर्टात उतरणे छान वाटले. मी खूप आनंदी आहे आणि खूप उत्साही आहे', असे साई प्रणीतने म्हटले आहे.
प्रणीतने श्वेताबद्दलचेही मत मांडले. 'श्वेता माझ्या कुटुंबाची निवड आहे, ती आयटी प्रोफेशनल आहे आणि ती काकीनाडाची आहे. आमच्या लग्नानंतर ती हैदराबादमध्ये मुक्काम करेल. आम्ही मे मध्ये प्रथमच भेटलो, ही बैठक आमच्या पालकांनी निश्चित केली होती. आम्ही आता लग्नासाठी तयार आहोत', असे प्रणीतने म्हटले आहे.