हाँगकाँग - भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांना हाँगकाँग स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभवाचे तोंड पाहावे लागले. सायनाला चिनी खेळाडू काई यान यानने तर समीरला तैवानच्या वांग त्झू वेईने पराभवाचा धक्का दिला.
सायना आणि काई यांच्याच झालेल्या सामन्यात काईने १३-२१, २०-२२ अशी बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सायना चिनी खेळाडूविरुद्ध चांगला खेळ करू शकली नाही आणि पहिला गेम १३-२१ ने गमावला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये सायनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण चिनी खेळाडूच्या झंझावती खेळासमोर सायना निष्प्रभ ठरली आणि तिने दुसरा गेम प्रतिकार करत २०-२२ ने गमावला.
पुरुष एकेरी गटात समीर वर्माला तैवानच्या वांग त्झू वेईने ११-२१, २१-१३, ८-२१ ने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या वांगला पहिल्या दोन गेममध्ये झुंजवले. मात्र, तिसऱ्या गेममध्ये वांगने एकतर्फी खेळ करत सामना जिंकला.