नवी दिल्ली - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या मदतीला भारतीय विदेश मंत्रालय धावून आले आहे. सायनाला पुढील आठवड्यापासून ओडेन्स शहरात सुरू होणाऱ्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे. यासाठी तिला व्हिसाची गरज होती. पण तिला व्हिसा मिळाला नव्हता तेव्हा तिने ट्विट करत विदेश मंत्रालयाची मदत मागितली होती.
विदेश मंत्रालयाने सायनाची अडचण ओळखून तिला तत्काळ व्हिसा प्रकरणी मदत केली. याबद्दल सामनाने ट्विट करत माहिती दिली. व्हिसाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून शुक्रवारपर्यंत व्हिसा मिळेल, अशी आशा तिने व्यक्त केली आहे. तसेच तिने विदेश मंत्रालयाचे आभारही मानले आहे.
डेन्मार्क ओपन स्पर्धा ओडेन्स या शहरात १५ ते २० ऑक्टोंबर दरम्यान रंगणार आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी सायना नेहवाल उत्सुक आहे. मात्र, तिला अद्याप डेन्मार्कचा व्हिसा मिळालेला नव्हता. यामुळे तिने विदेश मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करत ट्विट केले होते.