मुंबई -'दंगल' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिने अचानक चित्रपटक्षेत्रातून एक्झिट घेतल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. मात्र, 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटात ती अखेरची पडद्यावर पाहयला मिळणार आहे. या चित्रपटाची 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये स्क्रिनिंग होणार आहे.
१३ सप्टेंबरला 'द स्काय ईझ पिंक' हा चित्रपट या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहे. झायरा वसिमसोबत या चित्रपटा 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि रोहीत सराफ हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे.
झायरा वसिमने बॉलिवूडमध्ये एक-दोनच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. मात्र, तिच्या अभिनयामुळे ती बरीच लोकप्रिय झाली. 'दंगल'मध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगट हिची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं बरंच कौतुकही झालं होतं. त्यानंतर ती 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातही झळकली होती.
तिने कलाविश्वातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, अनेकांनी तिच्या या निर्णयाचं समर्थनही केलं. त्यामुळे आता 'द स्काय ईझ पिंक' हा तिचा शेवटचा चित्रपट असणार आहे.
प्रियांका चोप्रादेखील लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर, फरहान अख्तर देखील त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.