पुणे - आज समाजामध्ये महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना महिलांसाठी फक्त एक दिवस महिला दिन साजरा न करता 365 दिवस महिला दिन असलं पाहिजे असे मत पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला दिन विशेष कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रातील महिलांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील वाडेश्वर कट्टा या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामांकित महिलांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कट्ट्याला उपस्थित असलेल्या महिलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तसेच नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस हजर होत्या. यांच्यासोबतच उद्योग जगतात कार्यरत असलेल्या महिला सरकारी अधिकारी महिला यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबीयांमध्ये महिला दिन रोजच असतो असे सांगत, महिला पुरुष असा भेदभाव आमच्या घरात होत नाही. आम्ही पुरोगामी त्याबाबत बाहेर बोलतो त्याप्रमाणे घरापासूनच याची सुरुवात आहे आणि त्यामुळे आम्ही अधिकाराने बोलू शकतो. सध्याची परिस्थिती जर बघितली महिलां विषयी अनेक प्रश्न आहेत सगळ्या क्षेत्रात महिला जरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही असल्या तरी या महिलांचे अनेक प्रश्न आहेत समस्या आहेत. महिलांच्या समानतेच्या गोष्टी आपण करतो मात्र महिलांचा दिवस साजरा करण्याची वेळ का येते ? आपण महिला आणि पुरुष अशी तुला का करतो ? असा सवाल सुनेत्रा पवार यांनी केला. स्त्री आणि पुरुष अशी तुलना व्हायलाच नको महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे मात्र महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असे पवार म्हणाल्या.
तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सुद्धा फक्त 8 मार्च लाच महिला दिन न साजरा करता 365 दिवस महिला दिन साजरा केला पाहिजे असे मत मांडले. 350 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पत्नी येसूबाई यांना समानतेची वागणूक दिली होती, समानतेचा दर्जा दिला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला होता. आज सगळ्या समाजाने तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचा हा इतिहास मागे वळून पाहायला हवा, म्हणजे स्त्रीला कुठलच आव्हान अवघड राहणार नाही अशी प्रतिक्रिया प्राजक्ताने दिली.
नृत्यांगना आणि अभिनेत्री असलेल्या शर्वरी जमेनिस यांनी ज्याप्रमाणे महिला दिवस साजरा केला जातो तसा पुरुष दिन नाही. तो असायला हवा. महिला किंवा पुरुष असं वर्गीकरण करता कष्ट कर्तुत्व आणि गुण यांचा सन्मान व्हावा अशी भावना शर्वरी जमेनिस यांनी व्यक्त केली