मुंबई - 'आरे' कॉलनी परिसरात 'मुंबई मेट्रो ३' चं कारशेड उभारण्यासाठी सुमारे २७०० झाडांची कत्तल करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. शुक्रवार, ४ ऑक्टोबर रात्रीच ४०० पेक्षा जास्त झाडं कापण्यात आली. या परिस्थितीवर पर्यावरणप्रेमींसह कलाविश्वातील कलाकारांनीही दु:ख व्यक्त केलं. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन 'आरे' वृक्षतोडीचा निषेध व्यक्त केला आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त तेजस्विनी दररोज वेगवेगळ्या देवींचे रुप धारण करुन समाजातील घटनांवर भाष्य करत आहे. यावेळी 'आरे' वृक्षतोडीवर तिने 'गावदेवी'चं रुप धारण करुन या वृक्षतोडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई मेट्रोसाठी होणारी झाडांची कत्तल यावर तिने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
'गावदेवी'च्या रूपातील तेजस्विनीने झाडाला मीठी मारत आरेतील वृक्षतोडीवर निषेध व्यक्त केला आहे.
'थांब घाव घालू नकोस......याच्या मुळावर घालू नकोस ....समस्येच्या मुळावर घाल.... इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी.....या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा ...यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ....जंगलं साफ करा वस्त्या वाढवा....रस्ते बनवा...सोय फक्त स्वत:चीच बघा ....इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात....
अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय....तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील....', असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.