मुंबई - सध्या कोरोनामय वातावरणामुळे अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या मालिकांतूनही दिसू लागलंय. सोनी सब वर सुरु असलेल्या ‘वागले की दुनिया’ मालिकेतील मराठमोळे कुटुंब वागळे यांच्या सामाजिक, कौंटुंबिक समस्या आणि इतर गोष्टींवर विनोदी पद्धतीने भाष्य केले जाते. यावेळी वागळे कुटुंबियांना मोठा धोक्याचा सामना करावा लागला आहे. राजेश वागळेला हार्ट अटॅक आला आहे. राजेश वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांचा सामना करत आला आहे. बँक घोटाळा व कार्यालयामधील नवीन भागधारकांसह त्याला तणावाचा सामना करताना संघर्ष करावा लागत आहे. तणावात अधिक वाढ झाल्याने तो अधिक चिंताग्रस्त होतो आणि चक्कर येऊन खाली पडतो. ज्यामुळे वंदना व वागळे कुटुंब गोंधळून जाते.
राजेश वागळे या हार्ट अटॅकच्या स्थितीमधून स्वत:ला सावरतो, पण त्याचा मेडिक्लेम कालबाह्य होतो आणि बँक घोटाळ्यामुळे त्याच्याकडे इतर कोणताही वैद्यकीय विमा नसतो. राजेश बरा होत नसल्यामुळे डॉक्टर्स त्वरित एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला देतात. संपूर्ण कुटुंब निराश होऊन जाते आणि चमत्कार घडवून आणण्याच्या आशेसह साईबाबांकडे प्रार्थना करते. आधीच गोंधळून गेलेल्या वंदनाला पैशांच्या व्यवस्थेसंदर्भात संघर्ष करावा लागतो. ती शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पतीचे जीवन वाचवण्यासाठी ती तिचा हिऱ्यांचा हार ज्योतीला विकते. सखी व अथर्व त्यांचे सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करतात, श्रीनिवास मुदत ठेवीमध्ये बचत केलेली रक्कम देतात.