मुंबई- मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेलं 'अश्रुंची झाली फुले' हे नाटक नुकतंच नव्या स्वरूपात मराठी रंगभूमीवर दाखल झालं. मात्र या नाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय अभिनेता सुबोध भावेने घेतला आहे. राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘तुम्ही संकटात असताना आम्ही प्रयोग करूच शकत नाही’ असं म्हणत त्याने नाटकाचा हा दौरा पुढे ढकलत असल्याचं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे जाहीर केलं आहे.
तुम्ही संकटात असताना नाटकाचे प्रयोग करूच शकत नाही, सुबोधने रद्द केला पश्चिम महाराष्ट्र दौरा - कोल्हापूर
‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगासाठी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून करण्याचा निर्णय नाटकाच्या संपूर्ण टीमने घेतला होता. मात्र या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हा दौरा रद्द करत असल्याचं सुबोधने जाहीर केलं आहे.
‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचे मुंबई पुण्यात यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्याचे राज्यातील अन्य भागातही प्रयोग करण्याचा निर्णय निर्माते दिनू पेडणेकर, अभिजीत देशपांडे, सुबोध आणि नाटकाच्या संपूर्ण टीमने घेतला होता. त्यानुसार या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या ९ ऑगस्टपासून सातारा, सांगली, सोलापूर, मिरज, कोल्हापूर इथे या नाटकाचा दौरा पार पडणार होता. मात्र या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हा दौरा रद्द करत असल्याचं सुबोधने जाहीर केलं आहे.
मात्र नाटकाचा नियोजित दौरा रद्द केला असला तरीही या कठीण परिस्थितीमधून सावरताना कोणतीही मदत लागल्यास आवर्जून सांगा, तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचं सुबोधने म्हटलं आहे. तुम्ही संकटात असताना आम्ही प्रयोग करूच शकत नाही, असं सांगतानाच परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आम्ही नक्की पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आमच्या नाटकाचा दौरा घेऊन येऊ, अशी ग्वाही त्याने प्रेक्षकांना दिली आहे.