मुंबई- मराठीतील अजरामर नाटकांमधील एक असलेले, १९१७ साली राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले 'एकच प्याला' हे नाटक आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येत आहे. मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेल्या या नाटकातील तळीराम, सुधाकर आणि सिंधू ही प्रमुख पात्र प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्या दिग्दर्शनीय कौशल्याद्वारे रंगभूमीवर पुन्हा एकदा अवतरणार आहेत.
गडकरीचं 'एकच प्याला' नव्या संचात अवतरणार रंगभूमीवर, हे कलाकार झळकणार - ekach pyala
या संगीत नाटकातील सुधाकरची भूमिका अभिनेता संग्राम समेळ करीत असून सिंधूची भूमिका अभिनेत्री संपदा माने साकारत आहे. शिवाय 'तळीराम' ही राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, जयंत सावरकर, अशा दिग्गजांनी सजवलेली भूमिका अभिनेता अंशूमन विचारे करत आहे.
रंगशारदा प्रतिष्ठान निर्मित 'संगीत एकच प्याला' या नाटकात अंशुमन विचारे, संग्राम समेळ आणि संपदा माने या आजच्या कलाकारांची फळी आपणास पाहायला मिळणार आहे. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात आज या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. परिणामकारक नाट्य आणि सादरीकरण या बळावर थोडी थोडकी नव्हे तर १०० वर्षे रंगभूमीवर राज्य करणारे हे नाटक शताब्दीवर्षपूर्तीचे औचित्य साधून रसिकांच्या भेटीला येत आहे.
या संगीत नाटकातील सुधाकरची भूमिका अभिनेता संग्राम समेळ करीत असून सिंधूची भूमिका अभिनेत्री संपदा माने साकारत आहे. शिवाय 'तळीराम' ही राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, जयंत सावरकर, अशा दिग्गजांनी सजवलेली भूमिका अभिनेता अंशूमन विचारे करत आहे. तसेच अन्य भूमिकांतही शुभांगी भुजबळ, शुभम जोशी, मकरंद पाध्ये, शशिकांत दळवी, विजय सूर्यवंशी, दीपक गोडबोले, विक्रम दगडे, रोहन सुर्वे, प्रवीण दळवी, अशा गुणी कलाकारांची वर्णी लागली आहे. दारूमुळे आजही अनेक तरुणांच्या आयुष्याची आणि पर्यायाने त्यांच्या संसारांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे आजही तितक्याच ज्वलंत असलेल्या विषयावरील ह्या दर्जेदार नाटकाचे मायबाप रसिक स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे.