मुंबई - सुरत येथे झालेल्या अग्नीतांडवानंतर बरेच कलाकार आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने जागृत झालेले पाहायला मिळतात. अभिनेता रितेश देशमुखनेही हैदराबाद विमानतळावरील काही व्हिडिओ शेअर करून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रश्न उपस्थित केला आहे. ट्विटरवरून त्याने हे व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
रितेश देशमुखने हैदराबाद विमानतळावरील बाहेर जाण्याच्या दरवाज्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ साखळीने बंद केलेला दिसत आहे. रितेशने याबाबत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'मी यावेळी हैदराबाद एअरपोर्ट लॉन्जमध्ये आहे. आत आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एकच एलिवेटरचा पर्याय आहे. तेही बंद आहे. आपत्कालीन स्थितीतही जर अशीच परिस्थिती असेल, तर हा मार्ग एका अपघाताला आमंत्रण ठरू शकतो, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या व्हिडिओसोबतच त्याने दुसरा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलेय, की 'तुमचे विमान चुकण्याच्या मार्गावर असेल, तरीही सुरक्षारक्षक दरवाजा उघडत नाहीत. अशाप्रकारे पब्लिक एक्झिटला बंद करता येत नाही.'
रितेशने शेअर केलेला व्हिडिओ(सौजन्य-ट्विटर) रितेशने केलेल्या या ट्विटनंतर हैदराबाद विमानतळ प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली आहे. त्यांनी रितेशच्या ट्विटचे उत्तर देताना लिहिलेय, की 'रितेश देशमुख तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ऐक्झीट दरवाजा बंद करण्यात आला होता. त्याला कुलूप लावलेले आहे. ज्याची चावी दरवाज्याजवळच ठेवलेली होती. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत हा दरवाजा काचेचा असल्याने तोडताही येऊ शकतो. प्रवाशाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रितेश देशमुखचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या ट्विटवर चाहत्यांच्या देखील प्रतिक्रीया येत आहेत.