बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सुरू झाला आहे १० वा आठवडा. या घरातील सदस्य आता जवळपास ९ आठवडे कुटुंबापासून दूर राहिले आहेत आणि आपल्या परिवारापसून दूर, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क न साधता बिग बॉसच्या घरामध्ये तब्बल ६५ दिवसाहून अधिक दिवस रहाणं काही सोपं नाहीये. आणि म्हणूनच हा आठवडा सदस्यांसाठी त्यांच्या या प्रवासावातील अविस्मरणीय आठवडा ठरणार आहे. कारण सुरू होतो आहे फॅमिली वीक. सदस्यांना भेटायला येणार आहेत त्यांच्या परिवारातील सदस्य. घरातील सदस्य भेटून गेल्यावर पुन्हा जोमाने खेळण्याची उभारी, नवी ऊर्जा मिळते असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शब्द त्यांना हिंमत देऊन जातात.
बिग बॉस यांनी सदस्यांना ‘फ्रीझ’ होण्याचा आदेश दिला त्यामुळे प्रेक्षकांना कळलं की आता काय होणार आहे. सदस्यांची अखेर त्यांच्या कुटुंबियांशी भेट होणार आहे. विकासला भेटायला त्याची बायको घरामध्ये आली होती. तर जयला त्याच्या आई वडिलांनी भेट दिली. पण या भेटीसाठी देखील सदस्यांना बिग बॉसने एक टास्क दिला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतंच पार पडलं “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य. टॉप ८ पर्यंत पोहचल्यावर ही स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार हे निश्चित. इथवर पोहचल्यानंतर कोणत्याच सदस्याला आता नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर नको आहे. आणि त्यामुळे आता प्रत्येक सदस्य यातून स्वत:ला कसं वाचवता येईल यावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.