अभिनेत्री रीना मधुकरच्या आयुष्यातील ‘ती’ आणि ‘ती’! - अभिनेत्री रीना मधुकर
नवरात्रीमध्ये देवींच्या 9 रुपांची पूजा, उपासना केली जाते. ज्या शक्तीची पूजा संपूर्ण देशात केली जाते ती शक्ती, आदिशक्ती आपल्या सोबतच आहे. मग ती शक्ती आईच्या रुपात असो किंवा बहिण, मैत्रिण, बायको असो. अभिनेत्री रीना मधुकरने देखील तिच्या आयुष्यातील तिची शक्ती असलेल्या व्यक्तींबद्दल सांगितले आहे.
मुंबई -नवरात्री हा स्त्री शक्तीचा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने स्त्रियांच्या स्त्रीपणाचा आदर केला जातो. खरंतर हा प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या आदिशक्तीचा सण आहे असे म्हटले जाते. अनेकजण त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याविषयी वाटणारा आदर व्यक्त करतात. 9 दिवसांत देवींच्या 9 रुपांची पूजा, उपासना केली जाते. ज्या शक्तीची पूजा संपूर्ण देशात केली जाते ती शक्ती, आदिशक्ती आपल्या सोबतच आहे. मग ती शक्ती आईच्या रुपात असो किंवा बहिण, मैत्रिण, बायको असो. अभिनेत्री रीना मधुकरने देखील तिच्या आयुष्यातील तिची शक्ती, निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्या तिच्यासाठी पॉझिटिव्ह व्हाईब्स असलेल्या दुर्गाविषयी सांगितले आहे.
रीनाची ‘आदिशक्ती’ कोण या विषयी व्यक्त होताना रीना सांगते की, "मला डान्सची प्रचंड आवड आणि त्यात बाबांचा विरोध, त्यांच्यामते मी घरातल्यांसारखं डॉक्टर, इंजिनिअर व्हावं. पण माझी आवड आईला कळली होती आणि "तिला जे मनापासून करावंसं वाटतयं ते तिला करू द्या, ती जिथे कुठे शिकायला, प्रॅक्टिसला जाईल तिथे मी तिच्या सोबत असेन", असं समजावून आईने बाबांना विश्वासात घेऊन त्यांची परवानगी मिळवली. ’तुला ज्याची आवड आहे ते तू कर, मी आहे तुझ्या सोबत आणि एवढं मात्र लक्षात ठेव की कधीही कोणावर अवलंबून राहायचं नाही’, आईच्या या दोन वाक्यांनी मला नेहमी धीर यायचा. त्यानंतर मी आईच्या पाठिंब्यामुळे कला क्षेत्रात आले. माझी आई खूप स्वावलंबी आहे आणि तिने तिची ही शिकवण मला आणि माझ्या बहिणीलाही दिली. 'कोणावर ही अवलंबून राहू नये' हा कानमंत्र तिने आम्हाला दिला. जो खरंच उपयोगी पडला. या वयातही आई टेक्नॉलॉजीसोबत जुळवून घेते, 'मला यातलं काही कळत नाही' असं तिचं कधीच म्हणणं नसतं. 'गोष्ट नवीन आहे तर मी ती शिकून घेईन आणि स्वतः वापर करेन' हा जो तिचा स्वभाव आहे तो मला प्रचंड आवडतो आणि आपसूक तिचे हे गुण आणि संस्कार आमच्यावर झाले. त्यामुळे 'आई' ही माझी खऱ्या अर्थाने 'शक्ती' आहे.
पुढे रीना सांगते, "'मन उडू उडू झालं' मालिकेत 'मनमोकळेपणाने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगणारी' जी सानिका आहे, खऱ्या आयुष्यात तशीच मी आहे आणि जशी दीपिका आहे तशी माझी सख्खी बहिण रूपा आहे. मी जरी मोठी असली तरी रूपा अगदी मालिकेतल्या दीपिका सारखी आहे. समंजस, शांत, सर्वांना सांभाळून घेणारी, जेव्हा आई आणि माझ्यामध्ये ‘तू तू मैं मैं’ होतं तेव्हा मध्यस्थी करणारी रूपाच असते. तिचं आणि माझं नातं फार सुंदर आणि मैत्रिणी सारखं आहे. वयाने मी तिच्या पेक्षा जरी मोठी असली तरी ती माझं काही चुकलं, अगदी सुरुवातीपासून माझा एखादा सीन तिला नाही आवडला किंवा अपेक्षेप्रमाणे तो नीट नाही झाला की ती मोकळेपणाने ‘मला हा सीन नाही आवडला, यापेक्षा जास्त चांगला होऊ शकला असता’ असं थेट सांगते. थोडक्यात काय तर ती माझी बेस्ट समीक्षक आहे. ती माझी शक्ती आहेच. पण तिच्यातले दोन गुण जे मला जास्त प्रेरित करतात. ते म्हणजे तिचं कामाप्रती असलेलं 'डेडीकेशन आणि चिकाटी'.”
हेही वाचा -भिवंडीत फर्निचर गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी नाही