सध्या भारतातही जागतिक नृत्यप्रकारात माहीर नर्तक तयार झालेले आहेत. अमेरिकेत जन्मलेला आणि प्रस्थापित झालेला ‘हिप हॉप’ प्रकार आपल्या देशातही पॉप्युलर आहे. इतकंच काय त्यातील काहींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवलंय. लायन्स आणि मायनस थ्री या दोन्ही डान्स ग्रुप्सनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या हिप हॉप स्पर्धेत लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री ग्रुपही दहावं स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. तमाम भारतीयांसाठी आणि हिप हॉप प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
मी होणार सुपरस्टार स्पर्धेतील दोन स्पर्धकांनी अख्ख्या भारताचं लक्ष्य वेधून घेतलं. एक म्हणजे द लायन्स ग्रुप आणि दुसरा मायनस ३ ग्रुप. गेली काही वर्षे हे दोन्ही संघ हिप हॉप ही डान्स स्टाईल परफॉर्म करत आहेत. वर्ल्ड हिप हॉप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करावे या विचारांनी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवला. त्यांचे लक्ष्य होते अमेरिकेत होणारी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धा जिंकणं. ही स्पर्धा हिप हॉप करणाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत मानाची समजली जाते. याआधी लायन्स आणि मायनस यांनी भारतात होणाऱ्या हिप हॉप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं असल्यामुळे त्यांना वर्ल्ड हिप हॉपमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. लायन्स हा ७ जणांचा ग्रुप आहे. त्यांनी अडल्ट क्रु या प्रकारात सादरीकरण केलं. तर मायनस ३ यांनी मिनी क्रु या विभागात भाग घेतला. दरवर्षी ही स्पर्धा अमेरिकेत होते पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत १७० देशांनी एन्ट्री पाठवल्या होत्या. अटीतटीच्या या स्पर्धेत लायन्स आणि मायनस ३ या दोन्ही संघाची निवड होणं हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
आता महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हे लायन्स आणि मायनस थ्री हे दोन्ही ग्रुप सध्या स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचा भाग आहेत. त्यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकलेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘मी होणार सुपरस्टार’ मधील जबरदस्त टॅलेण्ट, या टॅलेण्टला पारखणारा सुपरजज अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे आणि संस्कृती बालगुडेचं दिमखदार सुत्रसंचालन यामुळे या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपल्या नृत्यामुळे जग जिंकणारे कलाकार मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आहेत याचा सार्थ अभिमान स्टार प्रवाह वाहिनीला आहे.