आयुष्यभर तरुण राहण्याचं वरदान लाभलेली अभिनेत्री असं मृणाल कुलकर्णीचं वर्णन करता येईल. मृणाल कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री आहे आणि तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी मनोरंजनसृष्टीतही आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. मृणालने अनेक ऐतिहासिक भूमिकांना एका वेगळ्याच उंचीवर नेले. पदार्पणातच लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीला लेखन आणि दिग्दर्शनातही गती आहे. ती आता 'प्लॅनेट मराठी'चा भाग असणाऱ्या 'प्लॅनेट टॅलेन्ट'चा भाग होत आहे.
'प्लॅनेट मराठी'च्या परिवाराचा हिस्सा झाल्याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणाली की, ''मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर उत्तम काम होत आहे. 'प्लॅनेट मराठी'मुळे ते सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे. प्लॅनेट मराठी हे मराठी प्रेक्षकांचे हक्काचे पहिलेवहिले मराठी ओटीटी आहे. 'प्लॅनेट मराठी'ने अल्पावधीतच आपल्या शाखा रुंदावल्या आहेत आणि अशा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करते. मराठीला सर्वदूर पोहोचवण्याचे अक्षय बर्दापूरकर यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. एवढा मोठा प्लॅटफॉर्म पाठीशी असल्याने अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना बळ मिळेल हे नक्की.''