पुणे -मराठी भाषेच्या साहित्याचा आवाका आणखी वाढावा तसेच, मराठी भाषेची समृद्धी व्हावी यादृष्टीने विश्व स्तरावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने विश्वमराठी परिषद मागील ८ वर्षांपासून हे साहित्य संमेलन आयोजित करत आहे. यावर्षीचे हे ९ वे मराठी साहित्य संमेल्लन राहणार आहे. यावर्षी कंबोडिया येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी स्थापत्य शास्त्रातील ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गो. ब. देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
कंबोडियामधील अंकोरवाट येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आतापर्यंत अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि इंडोनेशिया येथील बाली, तसेच दुबई या ठिकाणी संमेलन भरलेली आहे. प्रत्येक वेळी संमेलन आयोजित करत असताना मराठी साहित्या सोबतच विविध विषयातील मान्यवरांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्याविषयाची माहिती मराठी मध्ये कशाप्रकारे प्रभावी पणे मांडता येईल या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात. या वर्षी हा मान डॉक्टर देगलूरकर यांना मिळाला आहे.