मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एका गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांचे “तिला जगू द्या…” हे गाणे भाऊबिजेच्या निमित्ताने रिलीज झाले. या गाण्यात त्या मुलींना शिकू द्या, जगू द्या असे आवाहन करताना दिसतात.
या गाण्याच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लहून हा व्हिडिओ शेअर केला आहे. फेसबुकवर त्यांनी लिहिलंय, ''आज भाऊबिजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे -
तिला शिकू द्या
जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या
समाज भक्कम करायचा असेल तर
तिला आधी सक्षम होऊ द्या.
#दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या," असे लिहित त्यांनी व्हिडिओची लिंकही शेअर केली आहे. टी सिरीजने प्रकाशित केलेल्या या गाण्याचे संगीत श्रीरंग उर्हेकर यांनी दिलंय. संगीतकार आणि टी सिरीजच्या अनिरुध्द जोशी यांचे त्यांनी आभार मानले आहे.
हेही वाचा - भावाच्या लग्नात कांगडी गाण्यावर मनसोक्त थिरकली कंगना रणौत
अमृता फडणवीस यांना या गाण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. अनेकांनी त्यांचा आवाज श्रवणीय नसल्याची तक्रार करीत गायन थांबवण्याचा सल्ला प्रतिक्रिया देऊन दिला आहे.
प्रसिध्द दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तर एक पोस्ट फेसबुकवर लिहून अमृता फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
महेश टिळेकर यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट
''चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही, '' अशा शब्दात महेश टिळेकरांनी आक्रमक होऊन पोस्ट लिहिली आहे. टिळेकरांच्या या पोस्टवर कॉमेंट्सचा वर्षाव सुरू असून अमृता फडणवीस यांच्यावर प्रखर टीका होत आहे.
हेही वाचा - आराध्या बच्चन 'जय सिया राम' भजन गातानाचा व्हिडिओ व्हायरल