निर्माता- दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेता महेश कोठारे यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफी मागितली आहे. त्यांची निर्मिती असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील एका एपिसोडमध्ये स्त्री पात्राने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्यांच्यावर टीका होत आहे. त्यानंतर महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.
ज्येष्ठ अभिनेता महेश कोठारे यांनी ट्विटर एक व्हिडिओ शेअर करुन ही माफी मागितली. या व्हिडिओत ते म्हणतात, ‘मित्रांनो आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते त्या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात आमचे एक पात्र असलेल्या सँडीच्या ब्लाऊजवर वंदनीय गौतम बुद्ध यांचे चित्र होते. या घटनेमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मला, माझ्या संपूर्ण टीमला गौतम बुद्ध यांच्याविषयी खूप आदर आहे. ही चूक कोणीही मुद्दाम केलेली नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण या चुकी बद्दल मित्रहो, मी तुमची जाहिर माफी मागतो. अगदी मनापासून माफी मागतो. माझ्या यूनिट तर्फे, टीम तर्फे, आमच्या कलाकारां तर्फे सर्वांतर्फे मी आपली मनापासून माफी मागतो. आपण सुध्दा मला माफ कराल अशी मी आशा व्यक्त करतो. अशी चुक आमच्याकडून पुन्हा घडणार नाही याची खात्री देतो. धन्यवाद.''