मुंबई - 'प्रबोधन गोरेगाव' संस्थेतर्फे आयोजित 'प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते. ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान’, ‘ओबरहौसेन’ (जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण या समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले “टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, थियटर मधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ वेगळ पहात रहा. मी जे.जे. मध्ये फाईन आर्टसला असताना आम्हाला तेव्हा पाचही वर्षे प्रख्यात पेंटर प्रोफेसर प्रभाकर कोलते हे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला आर्टिस्ट म्हणजे काय हे सांगितले. खरंतर मला पेंटर व्हायचं आणि पॅरिसमध्ये स्वतःचा स्टुडीओ सुरु करायचा, असं सर्वकाही ठरलं होत. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच एक्सपोजर पाहिलं आणि मी चित्रपटांकडे, त्यातील अभिनयाकडे आकर्षित झालो.
कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. हा फेस्टिव्हल सुद्धा तुमच्या जीवनात असाच असंच काहीतरी वेगळ घडवणार आहे. ‘प्रबोधन’.. सोबत जोडली गेलेली माणसे मुळात वेगळी आणि दिग्गज आहेत.” प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे अध्यक्ष सुभाष देसाई याप्रसंगी बोलताना म्हणाले, “हा ‘लघुपट महोत्सव’ करावा असे ठरले त्यावेळी तो यशस्वी करण्यासाठी एकमेव नाव होते ते म्हणजे ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशोक राणे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला. ज्यांनी ज्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते. आणि ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांचे आभार, त्यांच्या उदंड सहभागामुळे हा लघुपट महोत्सव विशेष झाला, आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरु ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील.
या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता मात्र ते कोरोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.