मुंबई- नाटककार जयंत पवार यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये कलाक्षेत्रातील काही लोकांसोबत घडलेल्या घटना सांगत सरकार आरोप केला आहे. पुणे आणि मुंबईत नाटकाचा प्रयोग करण्यासाठी आलेल्या दोन नाटकाकारांच्या गटांची पोलिसांनी विनाकारण चौकशी करत, भीती पसरवण्याचे काम केल्याचे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. नाटकाचा हा गट डाव्या विचारसरणीचा असल्याने हा सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडला असल्याचे पवार यांचे मत आहे.
पवार यांनी आपल्या पत्रात सांगितलेली पहिली घटना अशी, की 9 ते 11 ऑगस्ट या दिवसांत दिल्लीहून जन नाट्य मंच (जनम) हा ग्रूप 'तथागत' हे नाटक घेऊन मुंबईला आला होता. नाटकाचा 10 ऑगस्ट रोजी आंबेडकर भवन, दादर येथे प्रयोग होता. तेव्हा पोलीस येऊन नाटकाविषयी चौकशी करुन गेले. दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता अंधेरीच्या हरकत स्टुडिओ या छोट्या नाट्यगृहात असलेल्या प्रयोगाच्या आधी वर्सोवा पोलीस स्टेशनचे दोन सीआयडी नाट्यगृहात आले. त्यांनी नाटकाच्या सेटचे फोटो काढले. त्यानंतर जन नट्य मंच ग्रुपचे प्रमुख सुधन्वा देशपांडे यांची चौकशी केली. नाटकाच्या स्वरूपाबाबत चौकशी केली. त्यानंतर हरकत स्टुडिओच्या मॅनेजरकडे यांना प्रयोगाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा केली. हे पोलीस इमारतीच्या बाहेर गेले आणि तिथे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या लोकांचेही त्यांनी फोटो काढले आणि ते निघून गेले.
तर दुसरी घटना, 15 ऑगस्ट्च्या पहाटे किंवा 14 ऑगस्टची मध्यरात्र उलटून गेल्यावर पुण्यातल्या एका हॉटेलवर घडली. कोठी या नावाने तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ग्रूप 'रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी' हे हिंदी नाटक घेऊन काही प्रयोग करण्यासाठी मुंबईतून पुण्याला गेला होता. हा पाच जणांचा ग्रूप चिंचवड इथल्या कामिनी नावाच्या हॉटेलवर मुक्कामाला गेला असता मध्यरात्रीनंतर अडीच वाजता दोन पोलिसांनी त्यांच्या रूमवर धाड टाकली. 'तुमच्यात यश खान कोण आहे? तो इथे कसा आला?' असं विचारत यश खान या तरुणाची झडती घेतली. त्याचे आयडी प्रूफ तपासले. त्याच्या रूममध्ये असलेल्या दोघांशी त्याचा काय संबंध आहे? अशी विचारणा करत तीन पुरुष व दोन स्त्रिया राहात असलेल्या ग्रुपच्या दोन्ही रूमची तपासणी केली. नाटकाचं सर्व सामान उचकटून पाहिलं आणि निघून गेले. अशी झडती करण्याचं कुठलंही वॉरंट त्यांच्यापाशी नव्हतं. 15 ऑगस्ट्च्या सुरक्षेसाठी ही तपासणी आहे, असं त्यांनी नंतर सांगितलं. पण तसं असेल तर संपूर्ण हॉटेलची किंवा इतर खोल्यांची झडती वा अन्य माणसांची चौकशी झालेली नाही.
पवार म्हणतात, या दोन्ही घटना नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणाऱ्या आहेत आणि त्या एका सरकारी यंत्रणेकडून घडवल्याचे मला वाटते. वरीलपैकी पहिलं नाटक करणारी संस्था डाव्या विचारांची आहे. (काँग्रेसच्या काळात ज्यांची हत्या झाली ते प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या पत्नी मालोश्री या संस्थेच्या प्रमुख आहेत). दुसऱ्या नाटकाच्या ग्रुपमध्ये एक रंगकर्मी धर्माने मुसलमान आहे. विचारांनी डावं असणं आणि मुसलमान असणं या दोन्ही गोष्टी आज अक्षेपार्ह आहेत असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल पवार यांनी केला आहे.