मुंबई - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले संपूर्ण देश आणि विदेशातील संगीतप्रेमींना धक्का बसला. संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. दिदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दिदींनी आवाज दिला आहे.
त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं जिवंत असणार आहेत.
सोनी मराठीवरील ‘इंडियन आयडल मराठी' मधून भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेला 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. सोनी मराठी वाहिनी आणि फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. यांनी महाराष्ट्रातील गायकांसाठी सुरांचा हा मंच उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमात येत्या १४ फेब्रुवारीला लता दिदींना स्वरांजली वाहण्यात येणार आहे.
'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर स्पर्धक आणि परीक्षक अजय-अतुल यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली. या वेळी गीतकार-कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेसुद्धा उपस्थित होते. ‘इंडियन आयडल मराठी’ चा २ तासांचा विशेष भाग १४ फेब्रुवारी रोजी, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा -आलिया भट्टचा साडीसोबतचा रोमान्स सुरूच, अनन्या पांडेचे ग्लॅमरस फोटो