फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. सोनी मराठीवर सुरु झालेला ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवितात. आता यात दोन सुप्रसिद्ध अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचाला भेट देणार असून प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्यात त्याबद्दल उत्साह आहे. हा सांगीतिक कार्यक्रम सुरुवातीपासूनच त्यातील बहारदार परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे.
अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. यंदाच्या आठवड्यात अभिनयाच्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज अभिनेत्री मंचावर येणार आहेत. ९० चं दशक गाजवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेतला.