मुंबई -अभिनेता हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला पडद्यावर झळकला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात हृतिकने गणितज्ञ आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचेदेखील कौतुक होत आहे. पहिल्याच आठवड्यात 'सुपर ३०'ने बॉक्स ऑफिसवर अर्धशतकाचा टप्पा पार केलाय.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या तीनही दिवसांच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने ११.८३ कोटीची कमाई केली. शनिवारी १८.१९ कोटी तर, तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २०.७४ कोटींची कमाई करत आत्तापर्यंत ५०.७६ कोटींची कमाई केली आहे.
पहिल्याच आठवड्यात 'सुपर ३०' ला मिळालेल्या यशामुळे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला चांगले यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता वर्ल्डकप स्पर्धा देखील संपली आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणखी प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात आहे.
हृतिकच्या 'मोहेंजोदडो' आणि 'काबिल' चित्रपटालाही 'सुपर ३०'ने मागे टाकले आहे. या चित्रपटात हृतिकची नेहमीपेक्षा वेगळी भूमिका पाहायला मिळते.