महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 31, 2020, 7:35 PM IST

ETV Bharat / sitara

मराठी वाहिन्यांच्या प्राईम टाईमवर या आठवड्यात चार नवीन मालिकांची एन्ट्री

मराठी टीव्ही वाहिन्यांवर गाजलेल्या मालिका बंद होऊन त्याजागी नव्या मालिकांची सुरूवात होणार आहे. लॉकडाऊननंतर मनोरंजनातही बदल होत असून या नव्या मालिकांवर एक नजर टाकूयात.

entry-of-four-new-series
चार नवीन मालिकांची एन्ट्री

मुंबई - मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील सर्व मालिकांच चित्रीकरण लॉकडाऊन संपताच नव्याने सुरू झालं. मात्र यातील काही मालिकांनी नुकतीच प्रेक्षकांची रजा घेतली. त्याजागी या आठवड्यापासून काही नवीन मालिका प्राईम टाईमवर आपल्या भेटीला येणार आहेत. कोणत्या आहेत त्या मालिका ते जरा पाहुयात..

झी मराठी

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचा नुकताच शेवट झाला. जिथून पहिल्या पर्वाची सुरवात झाली होती त्याच ठिकाणी दुसऱ्या पर्वाचा शेवट झाला. आता लवकरच त्याच लेट नाईट प्राईम टाईम स्लॉटवर देवमाणूस ही नवीन मालिका सुरू होते आहे. सध्या या मालिकेचे प्रोमो टीव्हीवर सुरू झाल्यावर सोशल मीडियावर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र गावोगावी बोगस डॉक्टर म्हणून आपल क्लिनिक थाटून लोकांना गंडवणाऱ्या एका डॉक्टरची कथा या थ्रिलर मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजपासून रात्री 10.30 वाजता ही मालिका सुरू होते आहे.

कलर्स मराठी

प्रत्येकच तरुणाला त्याच्या आयुष्यात सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार हवी असते.. मात्र बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं... " ठेंगणी”,"सावळी, "थोडी जाडी" "स्थूल" अशी नावं ठेवत काही मुलींच्या पदरी नकार येतो. थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकार' देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट कलर्स मराठी वहिनी घेऊन आली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘सुंदरा मनामध्ये भरली’... मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. नवोदित अभिनेत्री अक्षया नाईक ही या मालिकेत लतिकाच्या भूमिकेत असून 'क्लास ऑफ 83' या 'नेटफ्लिक्स' वरील सिनेमामुळे सध्या चर्चेत आलेला अभिनेता समीर परांजपे हा या मालिकेत अभिमन्यूची भूमिका करताना दिसणार आहे. ही मालिका इतर मालिकाना कशी टक्कर देते याची उत्सुकता कायम आहे. आजपासून दररोज रात्री 9 वाजता ही मालिका पहायला मिळेल.

स्टार प्रवाह

स्टार प्रवाह वाहिनी येत्या २ सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘मुलगी झाली हो’ असं या दोन मालिकांचं नाव असून या दोन्ही मालिकांद्वारे मुलीचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व यासारख्या सामाजिक विषयाला हात घालण्यात येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच सामाजिक भान जपत वेगवेगळ्या दर्जेदार मालिका सादर केल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’ सारखी वर्णभेदावर भाष्य करणारी मालिका टेलिव्हिजन विश्वात आणत स्टार प्रवाह वाहिनीने नवं आव्हान पेललं आहे. सामाजिक विषयावर आधारित या दोन्ही मालिकांमध्ये कोणती मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते ते पाहायचं..'फुलला सुगंध मातीचा' ही मालिका रात्री 8.30 वाजता तर 'मुलगी झाली हो' रात्री 9 वाजता पाहायला मिळेल.

तीन वाहिन्यांवरील चार नवीन मालिकांच्या आगमनामुळे पुन्हा एकदा काहीतरी नवीन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यातील कोणती मालिका दीर्घकाळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते यांची सगळ्यांना उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details