मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे 'महाडचा सत्याग्रह'. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे, यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले. २० मार्च रोजी या घटनेला ९२ वर्ष पूर्ण झाली. 'स्टार प्रवाह'वर १८ मे पासून म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेच्या शूटिंगची सुरुवातही याच ऐतिहासिक दिवशी म्हणजेच २० मार्चला करण्यात आली.
इतिहासाची साक्ष देणाऱ्या दिवशीच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेच्या शुटिंगला सुरूवात - mahamanav
या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मापासूनचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
शूटिंगच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा सागर देशमुख म्हणाला, 'महाडचा सत्याग्रह ज्यादिवशी झाला त्याच तारखेला, 'बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचे शूटिंग असावे हा निव्वळ योगायोग आहे, असे मी मानत नाही. काळाची गरज असेल म्हणूनच ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या आहेत. बाबासाहेबांचे शिक्षणाबद्दलचे विचार आणि सर्व समाजामध्ये समानता हे विषय अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. मला फार आनंद आहे या मालिकेचा मी एक भाग आहे आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचे मी एक माध्यम आहे'.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, अर्थकारण आणि राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तीदायी ठरतात. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेची निर्मिती केली आहे. याच कारणास्तव शूटिंगसाठीही ऐतिहासिक दिवसाची निवड करण्यात आली. या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मापासूनचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.