दिवाळीचा सण जसा आनंद उत्साहाचा तसाच तो आनंद वाटण्याचाही. आताच्या दिवाळीत अनेक बदल झालेत त्यापैकी एक म्हणजे आनंद वाटण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. काही पध्दतीतर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे दिवाळी ग्रेटींग कार्ड्स. दिवाळीच्या शुभेच्छा आप्त स्वकीय आणि मित्रांना देण्यासाठी पूर्वी अशी ग्रेटिंग कार्ड्स एकमेकांना पाठवण्याची पध्दत होती.
दिवाळी जवळ आली याचा पहिला अंदाज यायचा तो ग्रेटिंग कार्ड्सच्या दुकानांमुळे. वेगवेगळ्या आकाराची, आकर्षक कार्ड्स या दुकांनातून मांडून ठेवली जायची. यथावकाश पावले अशा दुकानाकडे वळायची आणि किती लोकांना आपल्याला कार्ड्स पाठवायची आहेत याचा अंदाज घेऊन खरेदी केली जायची. कार्ड्स बंद पाकिटात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची इन्व्हलप मिळत असत. दिवाळीची सुट्टी लागली की ग्रेटिंग कार्ड्स बनवण्याचीही लगबग घराघरात सुरू व्हायची. आपल्या हातून बनवलेली आकर्षक रंगसंगती, डिझाईन्सची ग्रेटिंग कार्ड्स बनवण्यात एक वेगळी सृजनशीलता आणि आपुलकी होती.
ज्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याचे नाव सुव्वाच्च अक्षरात लिहून पाकिट बंद व्हायचे. इन्व्हलपवर पत्ता लिहून, पोस्टाचे तिकीट चिकटवून हे पाकिट पोस्ट पेटीत पडायचे. पुढील दोन तीन दिवसाचा प्रवास करुन हे शुभेच्छा पत्र आपल्या आप्ताला मिळायचे.