मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे २ ऑगस्ट खूप खास दिवस आहे. कारण, याचदिवशी अमिताभ यांना लाखो करोडो चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे आणि डॉक्टरांच्या पराकोटीच्या प्रयत्नांमुळे नवे जीवनदान मिळाले होते. त्यांचा गाजलेल्या 'कुली' चित्रपटाच्या दरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची तब्येत अत्यंत नाजुक झाली होती. मात्र, चाहत्यांच्या अफाट प्रेमामुळे बिग बींना पुनर्जन्म मिळाला.
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत लहाणपणीचे श्वेता आणि अभिषेक बच्चन हे देखील पाहायला मिळतात. या फोटोमागचे रहस्य अभिषेकने त्याच्या पोस्टमधुन उलगडले आहे.
'३७ वर्षांपूर्वी ब्रीच कँन्डी रुग्णालयात माझे वडील 'कुली' दरम्यान झालेल्या अपघातातून बचावण्यासाठी झुंज देत होते. याच दिवशी त्यांना दुसरा जन्म मिळाला, असे आम्ही समजतो. कारण, याच दिवशी डॉक्टरांनी चमत्कारिक रित्या त्यांना वाचवले होते'.
अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'हा दिवस आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तुमचे हे प्रेम मी सदैव माझ्यासोबत ठेवतो. हे असे उपकार आहेत, जे मी कधीही फेडू शकत नाही', असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिग बी वयाच्या ७६ व्या वर्षीही पडद्यावर अगदी तडफदार अभिनय साकारताना दिसतात. लवकरच ते 'गुलाबो सिताबो', 'चेहरे', 'ब्रम्हास्त्र', 'झुंड' यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातूनही ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वयातही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची क्षमता इतर अभिनेत्यांना प्रेरणा देते.