भारतरत्न लता मंगेशकर यांचे या जगातून जाणे संपूर्ण देशाला चटका लावून गेले. लता दीदी ने तब्बल सात-आठ दशकं संगीताची मनोभावे सेवा केली. स्वर्गीय आवाजाचे दान घेऊन आलेल्या लता दीदीने पन्नास हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता दीदीला झी मराठी परिवाराकडून सुरेल आदरांजली वाहण्यात येणार आहे.
लता दीदींचं रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या गोड आणि सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच लता दीदींच्या सुरेल पर्वाला आदरांजली देण्यासाठी झी मराठी एक खास कार्यक्रम रविवारी १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सादर करणार आहे.