मुंबई- एकमेकांसोबत भांडण करताना अनेकदा तोंडात येणारा शब्द म्हणजे डोक्याला शॉट. जास्त त्रास देणाऱ्या मित्राला येता जाता 'आता तू माझ्या डोक्याला उगाच फार शॉट देऊ नकोस हा' अस आपण अनेकदा म्हणतो. असाच काहीसा शॉट हसवता हसवता प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न 'डोक्याला शॉट' या नव्या सिनेमामधूनही करण्यात आला आहे.
चार मित्रांची कथा -
शिवदर्शन पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' ही चार मित्रांच्या मैत्रीची गोष्ट आहे. अभिजित आठल्ये म्हणजेच सुव्रत जोशी, चंदू म्हणजेच ओंकार गोवर्धन, भज्जी म्हणजेच रोहित हळदीकर, आणि गण्या म्हणजेच गणेश पंडित अशा चार जिगरी मित्रांच्याभोवती ही गोष्ट फिरते. त्यातील अभिचं एक तामिळ मुलगी सुबलक्ष्मी अयंगर म्हणजेच प्राजक्ता माळीवर प्रेम असतं. वडिलांचा नकार होकारात बदलून हे लग्न अखेर ठरतं. मात्र त्याचवेळी हे चौघे मित्र क्रिकेट खेळताना अभिचं डोकं दगडावर आपटत आणि तो आधीच्या काही गोष्टी साफ विसरून जातो. त्यानंतर काय धमाल उडते ती या सिनेमाची कथा आहे.
विनोदी मात्र एका मर्यादेनंतर रटाळ -
वरवरून ती आपल्याला साधी वाटत असली तरीही ती फुलवण्याचं मोठं आव्हान दिग्दर्शक आणि लेखकापुढे होतं. त्यात त्यांनी शक्य ते सारं कसब पणाला लावलं आहे. जुन्या स्मृती विसारल्यामुळे अभि एकच वाक्य अनेकदा म्हणतो सुरुवातीला त्यातून विनोद निर्मिती होत असली तरीही एका मर्यादेनंतर ते काहीसं असहाय्य वाटू लागतं. पटकथा लेखक वरूण नार्वेकरने संवाद रटाळ वाटू नये म्हणून ते प्रसंग चांगलेच प्रभावी करण्यासाठी त्यात विनोदी प्रसंगाचा शिडकावा केला आहे. पण कुठेतरी ते संवाद वारंवार पात्राच्या तोंडी आणणं कथा पुढे नेण्याची गरज बनून गेल्यामुळे त्याचाही नाईलाज झाला आहे.
चित्रपटातील गाणी आणि कलाकारांचे अभिनय -
हे जरी खर असलं तरीही विनोद निर्मितीच्या बाबतीत हा सिनेमा अजिबात निराश करत नाही. अनेक प्रसंगात तुम्हाला पोट धरून हसू येत. सुव्रत जोशी आणि या सिनेमाद्वारे पदार्पण करणारा गणेश पंडित यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून असल्याने त्याचा ते पुरेपूर वापर करतात. प्राजक्ता माळी दिसली सुंदर असली तरीही मित्रांच्या गोष्टीत तिला फारसा वाव नाही. सिनेमात गाण्यांनाही फारसा वाव नसला तरीही मिकाच्या आवाजातील प्रमोशनल गाणं आणि कैलाश खेर यांच्या आवाजातील 'जोरू का गुलाम' ही दोन्ही गाणी चांगली जमून आलीत. सुव्रत आणि प्राजक्ताने गायलेलं तामिळ गाणं कथेचा भागात ओघाने येतं. ते तेवढयापुरतं ठीक वाटतं.
कथेचा जीव थोडासा असल्याचं भान दिग्दर्शकाला असल्याने त्याने पूर्वार्ध आणि उत्तरार्ध फार रटाळ होणार नाहीत याची योग्य खबरदारी घेतली आहे. मैत्रीवर आधारित सिच्युएशनल कॉमेडी सिनेमे आजवर मराठीत अनेक येऊन गेलेत. मात्र त्यातही लक्षवेधी ठरेल असा हा सिनेमा आहे. हसता हसवता डोक्याला मैत्रीचा शॉट लावून घ्यायचा असेल तर या सिनेमाच्या वाटेला जायला काही हरकत नाही.