महाराष्ट्र

maharashtra

'रॉ' एजंटच्या बलिदानाला फुटकळ पटकथेन पडलेलं भगदाड - रोमियो अकबर व्होल्टर

By

Published : Apr 5, 2019, 10:42 PM IST

Published : Apr 5, 2019, 10:42 PM IST

'रॉ' एजंटच्या बलिदानाला फुटकळ पटकथेन पडलेलं भगदाड - रोमियो अकबर व्होल्टर


'रोमियो अकबर वॉल्टर' तीन नाम एक काम ते म्हणजे हेरगिरीचं. शत्रूच्या भूप्रदेशात राहून त्याला न कळता अचूक माहिती काढून मायदेशी कार्यरत असलेल्या हेरखत्याला पाठवण्याचं. हे सारं काम जीवाची बाजी लावून करणाऱ्याला मात्र, कोणतीही ओळख नाही आणि चुकीला माफी तर नाहीच नाही. असे अनेक गुप्तहेर आजही शत्रूराष्ट्रामध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून काम करतात. मात्र, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यांचं अस्तित्व फक्त देशाची गुप्तहेर संस्था म्हणजे 'रॉ'. अशाच एका गुप्तहेराची कथा 'रोमियो अकबर वॉल्टर' या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

काय आहे कथानक-
कथा घडते ती १९७१ साली म्हणजेच भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वी या कथेला सुरुवात होते. दिल्लीतील एका राष्ट्रीय बँकेत काम करणाऱ्या अकबर अली उर्फ रोमियोच म्हणजेच जॉन अब्राहमच अभिनय कौशल्य हेरून आणि त्याची पार्श्वभूमी तपासून त्याची रॉ या देशाच्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख श्रीकांत राय म्हणजेच जॅकी श्रॉफ त्याची त्याच्या मिशनसाठी निवड करतात. त्याला या खात्यात काम करण्यासाठी तयार करायला राय यांचा सहकारी अवस्थी म्हणजेच राजेश श्रुंगारपुरे त्याला या मिशनसाठी तयार करतो. पुढे अकबर पाकिस्तानात कसा जातो आणि हेरगिरी करून भारत बांगलादेश यांच्या सीमेवरील संभाव्य हल्ल्याची गोपनीय माहिती कशी काढतो आणि त्याचा त्याचा देशासाठी सर्वस्व गमावून श्रेष्ठतम बलिदान देण्यापर्यंतचा प्रवास कसा होतो ते म्हणजे या सिनेमाची कथा आहे. नाही म्हणायला जॉनच्या भूमिकेला सहानुभूती मिळावी म्हणून एक विधवा आई आणि भारतीय भूमीत सोडून आलेली प्रेयसी म्हणजेच मौनी रॉय ही आहेत.

चित्रपटातील त्रृटी-
मुळात सिनेमाचा उत्तरार्ध सगळी पार्श्वभूमी दाखवण्यात खर्ची घातल्याने तो कमालीचा लांबलाय. गुप्तहेर बनण्याचं प्रशिक्षण त्यासाठी लागणारी चौकस नजर हे सारही नित्याचच आहे. हिरोच प्रेमात पडणं, आईला न सांगता हेरगिरीसाठी निघणं मग मधून मधून तिची आठवण येणं यातही म्हणावं तेवढं काहीं खास नाही. आता हेरगिरीचे प्रसंग म्हणाल, तर ते ही फार काही उत्कंठावर्धक नाहीतच. काही काही वेळा तर महत्वाच्या बातम्या सार्वजनिक ठिकाणी देताना दाखवण्यात आलंय. तर सगळ्यात कहर म्हणजे देशावर हल्ला व्हायला चार दिवस उरलेले असताना पाकिस्तानात डिप्लोमाट बनून आलेल्या प्रेयसीसोबत हा हेर चक्क कराचीमधील रस्त्यावर चुंबन घेत प्रणयप्रसंग घडतो. ते ही हे दोघेजण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या निगराणीखाली असताना. त्यामुळे हेराचं बलिदान श्रेष्ठ असलं, तरीही त्यातली हवा पार निघून जाते. अखेर हे सगळं अत्युच्च बलिदानाच्या पुरचुंडीत घालून प्रेक्षकांना सर्व्ह केलं जातं पण त्यातली मजा संपलेली असते.

असो सिनेमात जॉनने त्याचे गुण आणि कमतरता दोन्ही हेरून तिन्ही भूमिका चोख केल्या आहेत. मौनी रॉयने या चित्रपटात भूमिका साकारलीये. मात्र अशा सिनेमात अभिनेत्रीचं काम जेवढ्यापूरतं असतं, तेवढ्यापूरतंच तिचंही काम आहे. जॅकी श्रॉफ यांचा अभिनय भाव खाऊन जातो. अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर हा मात्र सिनेमात सरप्राईज पॅकेज ठरलाय. रॉ ऑफीसर खानची भूमिका त्याने समरसून साकारली आहे. सिनेमा संपला तरिही आपल्याला सिकंदरनक्की लक्षात राहतो.

तांत्रीक दृष्ट्या चित्रपट कसा आहे-
सिनेमाच आर्ट दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी या दोन विभागणना सिनेमाला तरल आहे. दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी पटकथेवर नीट काम केलं असतं तर, सिनेमा अजून चांगला होऊ शकला असता. मात्र, आता या सिनेमाची अवस्था घासून घासून गुळगुळीत झालेल्या साबणासरखी झाली आहे. ज्याला ना धड वास येत आणि ना फेस येत. त्यामुळे जॉनच्या देशभक्तीपर सिनेमाच्या यादीत अजून एक सिनेमा एवढंच या सिनेमाचं वर्णन करावं लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details