महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

FILM REVIEW: 'नोटबुक'! वहीच्या पानातून दरवळणाऱ्या प्रेमाचा सुगंध - pranutan bahl

नोटबुक चित्रपट प्रदर्शित

By

Published : Mar 29, 2019, 9:02 AM IST

मुंबई- सलमान खानची निर्मिती असलेला 'नोटबुक' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. सलमानने आपल्या बॅनरखाली आजवर अनेक नवोदितांना संधी दिली आहे. त्यात 'नोटबुक' या सिनेमाद्वारे दोन नवीन नावांची भर पडली. झहीर ईकबाल आणि दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बेहेल याची मुलगी प्रनुतन बहल यांना घेऊन 'नोटबुक' हा सिनेमा बनवला आहे.

दि टीचर्स डायरीचा रिमेक -

'नोटबुक' हा सिनेमा २०१४ मध्ये आलेल्या थाई भाषेतील दि टीचर्स डायरी या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मात्र थाई सिनेमाची कथा एका गावात घडते तर दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी 'नोटबुक'साठी देशाचं नंदनवन असलेल्या काश्मीरमधील अतिशय सुंदर लोकेशनची निवड केली आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षक सगळ्यात आधी या जागेच्या प्रेमात पडतात.

चित्रपटाची कथा -

दूर काश्मीरमधील एका सरोवराच्या मधोमध असलेल्या एका शाळेत फिरदौस म्हणजेच प्रनुतनची शिक्षक म्हणून बदली होते. या शाळेत आजूबाजूच्या घरामध्ये राहणारी जेमतेम ७ मुलं शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्याची वेळ सोडली तर या शाळेत शिक्षकाशिवाय कुणीच नसतं. मात्र काही कारणास्तव फिरदौसला ही शाळा सोडून जावं लागतं आणि त्याचवेळी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कबीर म्हणजेच जहीर या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होतो. तिथे आवराआवर करताना त्याला फिरदौसची एक नोटबुक सापडते. ती वाचता वाचता त्याचे या विद्यार्थ्यांशी संबंध जुळतातच पण नकळत तो फिरदौसच्या प्रेमात पडू लागतो. मात्र काही कारणामुळे वर्षभरात कबीरला ती शाळा सोडावी लागते आणि फिरदौस पुन्हा त्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होते. तेव्हा तिच्या त्याच 'नोटबुक'मध्ये कबीरने त्याचे अनुभव लिहिलेले असतात. ते वाचल्यावर फिरदौसला कबीरमध्ये एक चांगला माणूस सापडतो. पण हे दोघे एकत्र येतात का.?? की फक्त नोटबुकमधूनच भेटतात ते पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

कलाकारांचे अभिनय -

प्रनुतनने फिरदौसची भूमिका अतिशय सुंदर केली आहे. जहिर दिसलाय छान पण अभिनयाच्या बाबतीत त्याला अजून मेहनत घ्यावी लागेल. सिनेमात या दोघांच्या एवढीच ७ लहान मुलं महत्वाच्या भूमिकेत आहेत. ही सातही जणं आपलं मन जिंकल्याशिवाय राहत नाहीत.

उत्तम सिनेमॅटोग्राफी -

सिनेमाचं दोन बाबतीत मात्र विशेष कौतुक करायला हवं. एक म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि दुसरं म्हणजे आर्ट डिरेक्शन. सिनेमॅटोग्राफर मनोज कुमार याने काश्मीरचं निसर्गसौंदर्य एवढं सुंदर टिपल आहे, की प्रत्येक फ्रेमच्या तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. आर्ट डिरेक्शनच्या बाबतीतही ही शाळा आणि तिचे बारीकसारीक तपशील अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आलेत.

रिमेक हा प्रकार चांगल्या पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय. मूळ सिनेमाची कथा सुंदर असल्याने हिंदी व्हर्जन ही तसंच खास बनलंय. सलमान खान प्रोडक्शनचा विचार केला तर 'चिल्लर पार्टी' आणि 'बजरंगी भाईजान' यानंतर हा तिसरा चांगला सिनेमा तयार झाला. सिनेमातील गाणीही ठीकठाक आहेत. आता नवख्या कलाकारांना पाहायला प्रेक्षक थिएटरकडे वळाले तर त्यांना हे नोटबुक उघडून वाचवं असं नक्कीच वाटेल.

ABOUT THE AUTHOR

...view details