मुंबई- 'बदला' म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत पाहिलेलं काहीतरी नक्की डोळ्यासमोर येत असेल. मात्र, या सिनेमात घेतलेला बदला काहीसा वेगळा आहे. एक अंतिम सत्य आणि ते उलगडण्यासाठी एका पाठोपाठ एक असत्याचा केलेला पाठलाग या सिनेमात अतिशय सुंदररित्या मांडण्यात आला आहे.
सिनेमाची कथा -
कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला एक प्लॉट लागतो तो याही सिनेमात आहे. बंद खोलीत २ व्यक्ती त्यातील एका व्यक्तीचा खून होतो आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर या खुनाचा आरोप होतो. आता या खुनात अडकलेली व्यक्ती हा आरोप नाकारते आणि तिथूनच सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. यात खुनाचा आरोप असलेली व्यक्ती आहे नैना सूरी म्हणजेच तापासी पन्नू. तर तिला या आरोपातून सोडवण्यासाठी तिला भेटायला येतात ते वकील बादल गुप्ता म्हणजेच अमिताभ बच्चन. या नमनाला घडाभर तेल न घालता त्यांच्या भेटीने सिनेमाला सुरुवात होते आणि पुढे एक एक गोष्टी उलगडत जातात.
'दि इनविझिबल गेस्ट'चा हिंदी रिमेक -
आता सगळ्यात आधी हे सांगायला हवं, की हा सिनेमा काही ओरिजिनल हिंदी सिनेमा नाही. तर २०१७ साली आलेल्या 'दि इनविझिबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमाचा हिंदीतील रिमेक आहे. कहानी, कहानी २ यांसारखे थ्रिलर सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
कलाकारांच्या भूमिका -
सिनेमात अमिताभ आणि तापसी यांच्या भूमिका जबरदस्त झाल्या आहेत. बिग बींना वकिलाचा रोल असला तरी त्यांना फक्त बोलण्याचे श्रम पडलेत. बाकी ते करत असलेली इतर सिनेमांमधील धावपळ या सिनेमात त्यांच्या वाट्याला आलेली नाही. तापसीसोबत त्यांनी याआधीही 'पिंक'मध्ये वकिलाची भूमिका साकारली होती. तरीही या सिनेमात त्यांनी पुन्हा वकील बनायला होकार देण्यामागे सिनेमाची कथा हेच कारण पुरेसं होतं, असे सिनेमा पाहिल्यावर नक्की जाणवतं. या दोघांशिवाय अभिनेत्री अमृता सिंग ही देखील फारच दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. साराचा डेब्यू झाला असला तरीही अमृता यांच्या अभिनयातील चार्म कायम असल्याची साक्ष 'बदला' देतो. याशिवाय मानव कौल, नवोदित टोनी ल्यूक, आणि तन्वीर घनी यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
निराश न करणारा 'बदला' -
सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहताना कथानक पुढे पुढे जात असताना प्रेक्षक देखील त्या कथानकाचा भाग बनून कथेतील गुंता सोडवायला लागतो. असंच काही हा सिनेमा पाहतानाही घडतं. पण 'बदला' हा नक्की कोण? कुणाचा? आणि कसा घेतो? यापेक्षा जास्त असत्यावरचे पदर दूर करत सत्यापर्यंत पोहोचण्याची मांडणी नक्की कशी करण्यात आली आहे त्यासाठी हा चित्रपट जास्त लक्षात राहतो. तुम्हीही बॉलिवूडमध्ये बनणाऱ्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे फॅन असाल तर बदला तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.