मुंबई - 'आरे' परिसरातील वृक्षतोडीवर बरेच पडसाद उमटताना दिसत आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटींनीही आक्षेप दर्शवला आहे. आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्यावर निशाणा साधला आहे. गाणकोकीळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी 'आरे' संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज नाही का? असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.
विश्वंभर यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे.
'ज्येष्ठांच्या पिढीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलणं सोडून दिलंय का? आरेच्या प्रश्नावर मेधाताई सोडून कोणी बोलणार आहे की नाही? दरवेळी अण्णांकडूनच अपेक्षा नाही. ज्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असे मोठे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात आहेत. साहित्यिक, कलावंत, खेळाडू कधी बोलणार? त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?', असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.