मुंबई -आरेतील कारशेड प्रकरणी शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाने सर्व याचिका निकालात काढल्या. त्याला एक दिवस उलटत नसताना आरे कॉलनीतील झाडे रातोरात तोडण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या वृक्षतोडीवर बॉलिवूड कलाकारांनीही आपला संताप व्यक्त केला आहे.
संगीतकार विशाल दादलानी, अभिनेत्री दिया मिर्झा, स्वरा भास्कर, अशोक पंडित या कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा -आरेतील वृक्षतोडीला सुरुवात; नागरिकांची मोठ्या प्रमाणात निदर्शने
'रात्रीच्या वेळेत आरेतील वृक्ष तोडली जात आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपा करून, असे करू नका', असे विशाल दादलांनीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
दिया मिर्झानेही हा व्हिडिओ शेअर करून हे बेकायदेशीर नाही का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अशोक पंडित यांनीही याबद्दल शोक व्यक्त करत लिहिलंय, की 'आरेमधील ३००० झाडे तोडल्यामुळे आम्ही शोक व्यक्त करत आहे. ज्यांनी झाडांना आपल्या जीवनाचा एक भाग मानला आणि झाडे ही परमेश्वराची सर्वात मोठी देणगी मानली त्यांच्यासाठी हा सर्वांत वाईट दिवस आहे. या विनाशाची किंमत मुंबईला मोजावी लागणार आहे'.
हेही वाचा -मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात ३०० झाडांवर कुऱ्हाड.. पर्यावरणप्रेमींचा संताप
आरेतील वृक्षतोडीला सुरुवात झाल्यानंतर स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे. आरेतील वृक्षतोड तत्काळ थाबंवण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.