मुंबई -ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'शोले' चित्रपटातील त्यांच्या डायलॉगमुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. यामध्ये त्यांनी 'कालिया'ची भूमिका साकारली होती. तर, लोकप्रिय ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातही त्यांची व्हिलनची भूमिका प्रचंड गाजली होती. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
विजू खोटे यांचा अल्पपरिचय -
विजू खोटे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. आता वाढत्या वयामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीतील काम कमी केले होते. विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील, अशा भूमिका साकारल्या.
'या मालक' या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांत त्यांनी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारल्या. 'अशी ही बनवाबनवी', या चित्रपटात त्यांनी 'बळी' नावाची खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. विजू खोटे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. मात्र, ते त्यांच्या 'शोले' चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते.
'कालिया'चा 'सरकार', 'मैंने आपका नमक खाया है', हा संवाद आता ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोबतच त्यांची 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील 'रॉबर्ट' या भूमिकेतील 'गलती से मिस्टेक हो गया', हा संवाद खुप लोकप्रिय झाला होता.